एका सुताराची प्रेरणादायी कहाणी


एक सुतार काम करणारा 60 वर्षांचा माणूस होता तो आत्ता ज्या मालकाकडे काम करत होता तिथे त्याला 40 वर्षे झाले होते. ह्या 40 वर्षाच्या काळात त्याने हजारो घरे बनवली होती. पण आता त्याला संसाराला वेळ द्यायचा होता. तो त्याच्या मालकाकडे जाऊन म्हणतो, मालक 40 वर्षे मी तुमच्याकडे इमाने इतबारे काम केले पण आता मला माझ्या संसाराला वेळ द्यायचा आहे, माझ्या मुलांबरोबर, माझ्या मुलांच्या मुलांबरोबर वेळ घालवायचा आहे. मला रिटायर व्हायचे आहे.


आता मालक तर मालक असतात, जाता जाता सुद्धा आपल्या कामगारांकडून अजून थोडं काम कसं करून घ्यायचं हे त्यांना चांगलच माहिती असते. तेंव्हा मालक त्या सुताराला म्हणतो ठीक आहे. तुला रिटायर व्हायचंय तर तू होऊ शकतोस पण एक शेवटचे तीन महिन्यांचे काम आले आहे ते फक्त करून जा, ते काम झाल्यानंतर तुझा छान पैकी निरोप समारंभ करू आणि एकदम उत्साहात तुला निरोप देऊ. एवढे वर्ष मालकाने आपल्याला सांभाळून घेतलं, आपल्याला आधार दिला, हा विचार करून त्या सुताराने ते काम करायला होकार दिला.

पण आता त्याच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये फरक आला होता. त्याने विचार केला होता की मस्त घरी बसून आराम करेल, पण अजून 3 महिने काम करावे लागणार होते. आतापर्यंत प्रत्येक काम मन लावून केले होते पण आता कसेतरी करायचे म्हणून तो काम करत होता. ज्या सुताराने आपल्या पूर्ण आयुष्यात सगळ्यात सर्वोत्तम घरे बनवली पण आता शेवटचे घर बनवताना त्याचे अजिबात मन लागत नव्हते. कसेतरी लाकडे कापायची, कसेतरी खिळे ठोकायचे, कसेतरी पॉलिशिंग करायचे असे करत करत तो घर बनवत होता.

कसंबसं त्याने ते अर्धवट मनाने का होईना पण 3 महिन्यात घर पूर्ण केले. घर पूर्ण झाल्यानंतर तो सुटकेचा निश्वास सोडतो. झालं बाबा कसतरी असा तो विचार करतो. तो मालकाला जाऊन सांगतो, मालक घर पूर्ण झालं आहे. तेंव्हा मालक त्याच्याबरोबर घर बघायला निघतो. घर एकदम जवळ आलेले असताना तो मालक थांबतो त्या सुताराचा हात पकडतो आणि त्याच्या हातात त्या घराच्या चाव्या देत म्हणतो हे जे घर तू बनवलं आहेस ते तुला मी माझ्यातर्फे भेट म्हणून देत आहे. गेली 40 वर्षे तू माझ्याकडे जी मेहनत केलीस त्याचे फळ म्हणून हे घर मी तुला देत आहे. हे तुझे स्वतःचे घर होते जे तू बनवत होता.

मित्रांनो विचार करा काय वाटले असेल त्या सुताराला? काय चालले असेल त्याच्या मनात? अरे यार मला कोणी सांगितले असते की हे माझे घर आहे तर माझ्या आयुष्यातले सगळ्यात वाईट घर बनवण्याऐवजी मी सर्वोत्तम घर बनवले असते. अरे यार कोणी मला सांगितले का नाही की हे माझे घर आहे. सांगितले असते तर एक एक खिळा, एक एक लाकूड, पॉलिश करताना मी हजार वेळा विचार केला असता आणि एक सर्वोत्तम घर बनवले असते. मी आता परत मागे सुद्धा जाऊ शकत नाही. का मी असे केले?

आणि अश्याप्रकारे त्या सुताराला प्रचंड पश्चाताप होतो. मित्रांनो या गोष्टीसारखेच आपले आयुष्य चाललेले आहे. त्या सुतारासारखेच आपण सुद्धा रोज आपला भविष्यकाळ बनवत असतो. आत्ता आपण ज्या काही गोष्टी करतो आणि कश्याप्रकारे करतो त्याच्यावर आपला येणार काळ ठरत असतो. तो भविष्यकाळ जिथे आपण रहायला जाणार आहोत, जिथे आपण आपले आयुष्य जगणार आहोत. बरीच लोक त्यांचे भविष्य घडवत असतात, सजवत असतात, आत्ताच मेहनत करून त्याला सुरेख आकार देत असतात. पण काही लोक अशा गोष्टी करत असतात ज्याच्यामुळे त्यांना भविष्यकाळात पश्चातापच करावा लागतो.

तुम्ही जर नोकरी करत असाल, तिथे मेहनत करत असाल, नवीन गोष्टी शिकत असाल तर येणाऱ्या भविष्यात तुम्हाला चांगले प्रोमोशन आणि पगार वाढ मिळेल हे नक्की आहे. पण तुम्ही हे नीट करत नसाल तर तुम्ही सतत भीतीमध्ये जगाल की मला कोणी नोकरीवरून काढून तर टाकणार नाही ना? तुमचा व्यवसाय असेल आणि तुम्ही ग्राहकाला चांगला माल विकत असाल, ग्राहकांच्या आवडी निवडी लक्षात घेऊन व्यवसाय करत असाल तर एक दिवस तुम्ही मोठे व्यावसायिक व्हाल हे सांगायची गरज नाही, पण तुम्ही हे करत नसाल तर तुमचा व्यवसाय दिवाळखोरीत निघेल हे पण सांगायची गरज नाही.

तसेच तुम्ही विद्यार्थी असाल तुम्ही अभ्यास व्यवस्थित करत असाल तर तुमचा भविष्यकाळ हा सुवर्णकाळ असेल हे सांगायची गरज नाही, पण तसे करत नसाल तर तुमच्यावर सुद्धा ही वेळ येऊ शकते की यार मला कोणी सांगितले का नाही की अभ्यास केला पाहिजे होता. तुम्ही कोणीही असाल नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी, शिक्षक, गृहिणी तुम्ही रोज येणारा भविष्यकाळ बनवत असता. तुमचा येणारा भविष्यकाळ कसा असेल हे तुम्ही रोज काय करता यावर अवलंबून असतो. म्हणून आजपासूनच आपले भविष्य घडवायला सुरवात करा. मोठी स्वप्ने बघा आणि प्रत्येक दिवशी त्या स्वप्नांच्या दिशेने भरपूर मेहनत करून वाटचाल करा. हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. मित्रांनो नाहीतर तुमच्यावर सुद्धा त्या सुतारासारखी पश्चाताप करायची वेळ येईल आणि जेंव्हा ते समजेल तेंव्हा वेळ हातातून निघून गेलेली असेल. म्हणून आत्ताच सावध व्हा आणि कामाला लागा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*पुस्तकांचे महत्त्व*

स्वतःचा दृष्टीकोन सुधारा

प्रेरणादायी गोष्ट